मुंबई
संजय राऊतांचा धुमधडाका सुरूच असून आज तिसऱ्या दिवशी सलग त्यांनी फोटोबॉम्ब शेअर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गुंडासोबतचा फोटो ट्विट करीत पुन्हा एकनाथ शिंदेंना घेरण्यात आलं आहे.
शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा. ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे, अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत, पुणे आणि ठाणे पोलीस आयुक्तांनी या दाखलेबाज महात्म्याची माहिती जाहीर करावी! गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य, अशा शब्दात राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला.
पहिल्या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत पुण्यातील गुंड निलेश घायवळ दिसत आहे. पुण्यातील गँगस्टर म्हणून ओळख असलेला निलेश घायवळ याच्याविरोधात पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, खून, खूनाचा प्रयत्न असेही गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत. २०२१ मध्ये पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती.
दुसऱ्या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एक गुंड हातात भगवा घेऊन उभा असल्याचं दिसत आहे. त्या व्यक्तीवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे असून मोक्कामधून नुकताच तो बाहेर आल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत असे गुंड त्यांच्या पक्षात प्रवेश करीत आहेत, असा दावा राऊतांनी केला आहे.
तिसऱ्या फोटोत मुख्यमंत्र्यांसोबत ठाणे पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्याचांदीच्या दुकानांवर दरोडे, अशा दाखलेबाज गुन्ह्यात सहभागी असलेला गुंड आहे, असा दावा राऊतांनी केला आहे. याशिवाय जामीनावर बाहेर असलेला कुख्यात गुंड निलेश घायवाळ याची मंत्रालयात येऊन रिल शूट केल्याचं समोर आलं आहे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला आहे.