मुंबई
मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने बसले आहेत, निवडणूक आयोग घटनाबाह्य सरकारला पाठबळ देत आहे. जो न्याय अदानींना मिळतो, देशातील जनतेला का मिळत नाही, हा प्रश्न आहे. अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत, असा टोला शिवसेनेच्या उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजनसोबत चर्चा सुरू असून ती सकारात्मक पातळीवर असल्याचं राऊतांनी यावेळी सांगितलं. जागावाटपाचा मुद्दाही अंतिम टप्प्यात असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत. विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का? अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची संविधानाने तरतूद केली नाही, १० जानेवारीला काय निकाल लागतो यावर अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने बसलेले आहेत. घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतंय, हे लोकशाहीचं दुर्देवं. या देशात सत्याचा विजय म्हणजे अदानींचा विजय अशा शब्दात राऊतांनी मोदी सरकारवर खरमरीत टीका केली.
जागावाटपा संदर्भात काँग्रेसमध्येही आणि शिवसेनेमध्येही तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाहीत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या आधीच युती झालेली आहे. ती युती असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वंचित बहुजन आघाडीला माहाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात कोणतीही हरकत नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली आणि वाटाघाटी करत आहोत. या देशांमध्ये मोदींचे राज्य असू नये या देशांमध्ये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीने प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि देशांमध्ये आवाज उठवतात, असंही राऊत यावेळी म्हणाले.