मुंबई
काँग्रेसकडून आज विधिमंडळात आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसचे ३६ आमदार उपस्थित होते. बैठक संपली तरी ७ आमदार आलेच नाहीत, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणकोणते आमदार त्यांच्यासोबत जाणार याबाबत चर्चा सुरू असताना आता विधिमंडळाच्या बैठकीत ७ आमदारांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
७ पैकी ३ आमदारांनी आधीच कळवल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं आहे. या बैठकीत मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव जळगावकर उपस्थित राहणार नव्हते, अशी माहिती पटोलेंनी दिली आहे.
जितेश अंतापूरकर, माधवराव जवळगावकर, अस्लम शेख, झिशान सिद्दिकी, मोहन हंबर्डे, अमित देशमुख आदी आमदार बैठकीला गैरहजर होते. तीन आमदारांनी काहीच कळवलं नसल्याचं सांगितलं जात आहे. ते तीन आमदार अशोक चव्हाणांसोबत आहेत का, असाही सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे.
बुधवारीही काँग्रेस आमदारांची विधानभवनात बैठक बोलावण्यात आली होती, मात्र काही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. काँग्रेसच्या एकूण आमदारांपैकी 25 आमदार फक्त उपस्थित होते, तर इतर आमदार गैरहजर होते. अशोक चव्हाण यांच्याबरोबर त्या भागातील इतर काही आमदार देखील काँग्रेस सोडणार, असे बोलले जात आहे. त्यामुळे आज सर्व आमदारांना व्हीप देऊन काँग्रेस बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत सर्व काँग्रेस आमदार उपस्थित राहतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.