मुंबई — मुस्लिम ओबीसी चळवळीचे प्रणेते, लोहियावादी विचारांचे कट्टर अनुयायी आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा मुस्लिम समाजात नेणारे ज्येष्ठ नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आणि विशेषतः पस्मांदा मुस्लिम चळवळीवर मोठा आघात झाला आहे.
ज्येष्ठ नेते कपिल पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, “मुस्लिम ओबीसींचा एक खरा योद्धा आज आपल्यातून गेला आहे. वंचित आणि उपेक्षित मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम त्यांनी आयुष्यभर केले.”
ओबीसी चळवळीचे आधारस्तंभ
शब्बीर अन्सारी यांनी सत्तरच्या दशकात अॅड. जनार्दन पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीची पायाभरणी केली. पुढे त्यांनी गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, शरद यादव, रामविलास पासवान आणि चौधरी ब्रह्मप्रकाश यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसोबतही काम केले.
१९८३ मध्ये जालना येथे मुस्लिम ओबीसी संघटनेची स्थापना करण्यात आली. या मेळाव्याला अझगर अली इंजिनिअर, रा.सु. गवई आणि रामविलास पासवान उपस्थित होते. पुढे १९९५ मध्ये या संघटनेचे रूपांतर ‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’मध्ये करण्यात आले.
पस्मांदा मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम
शब्बीर अन्सारी यांनी महाराष्ट्रातील ६० ते ७० हून अधिक मागासवर्गीय मुस्लिम जातींचा शोध घेऊन त्यांना संघटित केले. जुलाहा, बुनकर, मोमीन, अत्तार, मेहतर, कसाब, कुरेशी, पिंजारी, नदाफ, फकीर अशा अनेक वंचित समाजघटकांना त्यांनी शिक्षण आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणले.
त्यांच्या प्रयत्नांमुळेच १९९४ मध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात मंडल आयोगाच्या शिफारशी मुस्लिम ओबीसींसाठी लागू करण्यात आल्या. या निर्णयामुळे हजारो मुस्लिम युवकांना शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या.
साधेपणात आयुष्य घालवलेला नेता
इतकं मोठं सामाजिक कार्य करूनही शब्बीर अन्सारी यांनी अत्यंत साधं आयुष्य जगलं. आयुष्यभर ते पत्र्याच्या घरात राहिले आणि कोणत्याही पद-पुरस्कारांच्या अपेक्षेशिवाय काम करत राहिले.
कपिल पाटील यांनी सांगितले की, “४५ वर्षांचा आमचा सहप्रवास आज थांबला. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”
राजकीय योगदान
शब्बीर अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षातून मिरज येथून हाफिज धतुरे आणि भिवंडी येथून रशीद ताहीर मोमीन यांसारखे आमदार निवडून आले होते. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना राजकीय मुख्य प्रवाहात आणले.
शब्बीर अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

