शहादा – डोंगरगाव रस्त्यावर शतपावली करणाऱ्या माय-लेकांना भरधाव फॉर्च्युनरने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातात त्यांच्यासोबत असलेल्या श्वानाचाही मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर वाहनचालक फरार झाला होता.
ही दुर्घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वाजता संजय पावभाजी समोर घडली. कल्पना गजानन वाघ (45), मुलगा आकाश वाघ (19) आणि भाविक वसईकर (द्वारकाधीशनगर, शहादा) हे शतपावली करत असताना मद्यधुंद चालकाने फॉर्च्युनर (MH-15-JA-5055) वाहन वेगाने चालवत त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात कल्पना वाघ आणि श्वानाचा जागीच मृत्यू झाला. आकाश वाघला गंभीर अवस्थेत धुळे रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला, तर भाविक वसईकर जखमी आहे.

अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तपास करून आरोपी आदित्य उचित पाटील (जॉन डियर ट्रॅक्टर शोरूम मालकाचा मुलगा) याला 15 तासांनी अटक केली. नातेवाईकांच्या तीव्र संतापानंतर पोलिसांनी त्याला पहाटे ताब्यात घेतले. आरोपीने अपघातानंतर वाहन लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले असून, त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी मृतकांच्या नातेवाईकांनी केली आहे.
शहादा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम 106(1), 281, 125(A), 105, मोटार वाहन कायदा 184, 134, 187 तसेच प्राण्यांच्या छळ प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कलम 11(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करत आहेत.
मयत कल्पना वाघ यांच्या मुलीचा नुकताच 14 फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाला होता, तर 16 फेब्रुवारी रोजी कुटुंबीय आणि मैत्रिणींनी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.