नाशिक
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकमधील चांदवड येथे रस्तारोको आणि सभा घेण्यात आली. यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. केंद्र सरकारत्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
कांदा निर्यात बंदीविरोधात शरद पवार थेट मैदानात उतरले आहेत. ते चांदवड येथील आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या कांद्याविषयीच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
दुसरीकडे आज कांदा प्रश्नावर दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापाऱ्यांनी अमित शहा यांची भेट घेतली.
दरम्यान चांदवडमध्ये शरद पवार आंदोलनात सहभागी झाले. यावेळी घेतलेल्या संभेत त्यांनी नागरिकांना संबंधित केलं. यावेळी शरद पवारांनी केंद्राला काय आवाहन केलं, याबाबत जाणून घेऊया.
काय म्हणाले शरद पवार
- केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही
- केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव नाही
- कांदा निर्यात करणार नाही, हा केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे.
- कांदा निर्यातीवरील बंदी उठवायलीच पाहिजे.
- चांदवडमध्ये शेतकरी रस्त्यावर आल्यानंतर सरकारची झोप उडाली आहे. मात्र येवढ्यावर समाधान मानायचं कारण नाही. शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखण्याची गरज आहे.
- इथेनॉल बंदीचा निर्णय धोकादायक