X : @therajkaran
मुंबई: निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पुन्हा एकदा पक्षाची बांधाबांध सुरु झाली आहे. यात निवडक आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांची वर्णी लागणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खास गोटातून समजत आहे. तळागाळातील मतदारांचा संपर्क आणि जनमानसातील प्रतिमा पाहिली जाणार आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील जिल्हाध्यक्षांची निवड सुरु झाली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या मंगळवारच्या निर्णयानंतर शरद पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांकडून शरद पवार असतील तीच राष्ट्रवादी अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. शरद पवार यांची राजकीय जिद्द पाहूनच आपण त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. मूळ पक्षाची बांधणी आणि रचना शरद पवार यांनी केल्याने पक्षात कायमच लोकशाही राहिली आहे. अशा वेळी त्यांना सोडून कुठेही जाणार नसल्याच्या आणाभाका खाल्ल्या जात आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येत आहेत. ईशान्य मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी कैलाश कुशेर यांची निवड होण्याची मोठी शक्यता आहे.
कैलाश कुशेर हे ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान तालुका अध्यक्ष असून त्यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांची निवड केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून समजत आहे. ईशान्य मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयातील प्रश्न, जेव्हीएलआर तसेच मेट्रो उभारणीच्यावेळी स्थानिकांचे सोडवलेले प्रश्न, तसेच कचरा समस्या सोडविण्यासाठी कुशेर यांनी प्रयत्न केले आहेत. कुशेर यांनी येथील स्थानिक प्रश्न खा. सुप्रिया सुळे यांच्या दालनापर्यंत नेऊन समस्यांना न्याय दिला असल्याची उदाहरणे येथील स्थानिक देत आहेत. त्यामुळे ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष पदी कैलाश कुशेर यांची वर्णी लागेल असे चित्र आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची परिक्षा सुरु झाली असून अशा अनेक परिक्षांमध्ये शरद पवार यांचा अनुभव उपयोगी पडला आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांवर विश्वास ठेवूनच प्रामाणिक आणि निष्ठावान तळागाळातील कार्यकर्त्यांची प्रमुखपदी निवड करुन पुनर्बांधणीस सुरुवात झाली असल्याचे सध्या चित्र आहे.