अजित पवारांनंतर आता शरद पवार बोलणार; अजितदादा गोटात मोठी हालचाल
मुंबई
अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकांसंदर्भात काल कर्जतमध्ये घेतलेल्या बैठकीत शरद पवारांचं नाव न घेता मोठे गौप्यस्फोट केलेत. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी आज शरद पवारांनी सर्व आमदार आणि खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं जातंय. यावेळी अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर शरद पवार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची पुण्यात आज एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. अजित पवार गटाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. यासंदर्भात बैठकीत चर्चा होऊ शकते. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर शरद पवार दुपारी ४ वाजता एक पत्रकार परिषद घेणार आहेत.
अजित पवारांचे काय आहेत आरोप?
- प्रत्येक वेळी आम्हाला भेटायला बोलावून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. राजीनामा मागे घ्यायचा होता तर तो दिला कशाला असाही प्रश्न त्यांनी यावेळी पवारांना विचारला.
- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सरकारमध्ये जाण्यासाठी हालचाली सुरू केल्यानंतर १ मे रोजी राजीनामा देणार होता, त्यानंतर तुम्ही सरकारमध्ये जा असं शरद पवारांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.
- जयंत पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, अनिल पाटील, दिलिप वळसे पाटील आणि सुनिल तटकरे अशा सगळ्यांसोबत माझ्याकडे बैठक झाली. बहुमताला महत्व दिले पाहिजे हे मी सुप्रियाला सांगितलं. त्यानंतर काही दिवसानंतर आम्ही यशवंत चव्हाण सेंटरला गेलो आणि साहेबांना भेटलो, त्यांनी थेट राजीनामा दिला. आम्हाला कळत नव्हते काय सुरू आहे. नंतर परत राजीनामा मागे घेतला. जर परत घ्यायचा होता तर दिला का, गाफील ठेवायचे आणि काही सांगायचे नाही, अशी धरसोड का केली, असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थितीत केला.
- “जागा वाटपाबाबत लकरच चर्चा हेईल. सातारा, शिरूर, रायगड, बारामती या जागा आपन लढवू, बाकीच्या जागांबाबत एकनाथ शिंदे, फडणवीसांसोबत चर्चा होईल” असं म्हणत कार्यकर्त्यांना ताकदीने कामाला लागा असं आवाहन केलं आहे.
- दरम्यान अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे ते सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.