धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीतून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेची असताना तिथे अनेकजणं लढण्यास इच्छूक होते. मात्र ती जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीने तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा तातडीने पक्ष प्रवेश करून घेत त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती.
दरम्यान शिवसेनेचा धाराशिव येथील शिंदे गट आक्रमक झाला असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिंदे गटाकडून वर्षा बंगल्यावर शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 3 हजार गाड्या घेऊन 25 हजार शिवसैनिक धारशिवमधून मुंबईकडे निघाले आहेत.
धाराशिव येथील लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला असून मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याची माहिती आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून धनंजय सावंत इच्छुक होते. मात्र ही उमेदवारी राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना दिल्यामुळे शिंदे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे.