मुंबई : शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अवमानजनक भाष्य केल्याच्या निषेधार्थ बाळासाहेब भवन येथे ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.
शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवला.
टीका करताना भाषेची पातळी पाळा – शीतल म्हात्रे
या वेळी शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “संजय राऊत यांनी यापूर्वीही स्वप्ना पाटकर, कंगना रणौत, नवनीत राणा यांच्यासारख्या महिलांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. राजकीय वाद असले तरी भाषा योग्य असली पाहिजे. आज फक्त पोस्टरला जोडे मारले आहेत, पण पुढच्या वेळी तोंडात चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
संजय राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन – शिवसेना महिला आघाडी
या आंदोलनात कला शिंदे, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, शिल्पा देशमुख, सुशीबेन शाह, नीलम पवार, शीतल बित्रा, सुनिता वैती तसेच मुंबईतील सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
शिवसेना महिला आघाडीने संजय राऊत यांनी त्वरित माफी मागावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील घडामोडींवर लक्ष केंद्रीत आहे.