पंढरपूर
महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने हातात एक बोर्ड घेतला आहे. या फोटोवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसेचा फोटो आहे. हातात त्यांचे फोटो घेऊन तरुण नथुराम गोडसेची जयची घोषणा देत आहे. त्याच्यासोबत जमाव असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पंढरपूरातील असल्याचं सांगितलं जात आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिन साजरा करण्याऐवजी महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंठकांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे करत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण केले जात आहे सरकारने अशा घटनांना आळा घातला पाहिजे. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्याचे उदात्तीकरण केले जाते ही बाब अत्यंत गंभीर आहे. सरकारने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घोषणाबाजी करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर करत धुडगूस घालणाऱ्या प्रवृत्तींचा सरकारने बंदोबस्त करावा. या माथेफिरूंना कायमची अद्दल घडेल अशी कारवाई सरकारने करावी. जेणेकरून पुन्हा असे अनुचित प्रकार घडणार नाहीत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सबंध जगाला व देशाला मानवतेचा संदेश दिला. अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचा विचार सर्वसमावेशक तसेच सर्व समाज घटकांना एकत्र करून मानवतेच्या उत्थानाचा होता. जगभर त्यांच्या विचारांचे अनुकरण केले जाते. अशा थोर महापुरुषाची हत्या करणाऱ्याच्या समर्थनार्थ प्रजसत्ताक दिनाच्या वातावरणात घोषणाबाजी होते हे महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. परदेशात गेल्यावर देशाचे पंतप्रधान महात्मा गांधींना नमन करतात. महात्मा गांधींचा अभिमान असल्याचे सांगत फिरतात. मात्र मोदीजींचा आशीर्वाद असलेल्या महायुतीच्या सरकारच्या काळात नथुराम गोडसेचे सार्वजनिकरित्या उदात्तीकरण केले जाते. यावरून सरकारची वृत्ती समोर येते, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहे.