Twitter : @NalavadeAnant
मुंबई
आमदारांच्या आपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात निर्णय घेण्यास सांगितले आहे, यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “मला आतापर्यंत कोणत्याही आदेशाची प्रत मिळालेली नाही. मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्या विषयी माहिती घेऊन, योग्य निर्णय घेईन.”
आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिरंगाई होते, असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदविले आहे. यावर पत्रकारांनी सोमवारी राहुल नार्वेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, “माझ्या ऐकण्यात आले नाही. मी ऐकले की, सुप्रीम कोर्टाने म्हटले की, विधानसभा अध्यक्ष संवैधानिक पद आहे. यामुळे कोर्टात यासंदर्भात उल्लेख होणे अपेक्षित नाही.”
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही आणि पुढील तीन आठवड्यासाठी सुनावणी पुढे ढकलली.
सुप्रीम कोर्टाने म्हटले की, आमदार अपात्रतेसंदर्भात वेगाने कारवाई यावी, यासंदर्भात पत्रकारांना राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, “मी यापूर्वी देखील सांगितले की, कारवाई लवकरात लवकर होणार आहे. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. पण कोणतीही घाई देखील होणार नाही. जेणेकरून गडबडीत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही.”