Twitter : @therajkaran
मुंबई
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण सुरु केले असून जरांगे- पाटील यांनी ‘कुठे असाल तिथे उपोषणाला बसा’ असें आवाहन कालच समाजाला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत मराठा समाज एकवटत आहे. पवई येथील सकल मराठा समाजाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. यात आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात आले.
यावर बोलताना पंकज लाड यांनी सांगितले की, जरांगे- पाटील यांच्या उपोषणाकडे आम्हा सर्वांचेच लक्ष असून आंदोलनात कसे सहभागी होता येईल यावर विचार करत आहोत. यात जरांगे-पाटील यांचे कुठे असाल तिथे उपोषणाला बसा यावर अधिक विचार करण्याचे ठरत असल्याचे लाड यांनी सांगितले. पंचकुटीर येथील दुर्वाप्रिय गणपती मंदिरात झालेल्या बैठकीत गजानन पवार, आनंद घोरपडे, अविनाश थोपटें, निलेश येवले, मनिष गावडे, बाळू कहडणे, बबन दगडू गोडसे, संभाजी मिसाळ, विजय शिवाजी कानसकर आणि विनायक जगदिश शेटे आदी उपस्थित होते.
बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी मराठा समाज एकत्र येत असून आरक्षण बाबत आम्ही दिल्यासारखे करतो तुम्ही घेतल्यासारखे करा, या सबबीला समाज कंटाळला असल्याने तीव्र नाराजी दिसून येत आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकीवर देखील दिसू शकतो, असे आतापासून स्पष्ट होत आहे.
पवईसह घाटकोपर, कुर्ला आदी ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु असून आंदोलनच्या दिशा हाच विषय बैठकांचा असल्याचे समजत आहे.