मुंबई
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा असताना त्यांच्याच गटाचे नेते सुनील तटकरे यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगणार आहे.
एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरेंनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील अशी माहिती तटकरे यांनी कार्यक्रमावेळी दिली. परंतू याबद्दल अंतिम निर्णय जागावाटप जाहीर झाल्यानंतरच होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या जागावाटपाबद्दल अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र बारामतीची जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आली तर तेथून सुनेत्रा पवार उमेदवार असतील असंही तटकरे यावेळी म्हणाले.
तटकरेंकडून संजय राऊतांचाही समाचार
आम्ही कुठे जावं हे ठरवणारे संजय राऊत कोण ? त्यांच्या पक्षातील लोकच त्यांचं ऐकत नाही. आम्ही कसे ऐकणार ? असा खडा सवालही त्यांनी विचारला. मला राऊत यांच्याबद्दल आदर आहे. ते आमच्या जिल्ह्यातील आहेत. प्रतिथयश संपादक आहेत. त्यांचं लिखाण चांगलं आहे. पण त्यांच्या बोलण्यामुळे आमचं जाणं थांबलं असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांना त्यांची माणसं थांबवता आली नाहीत, ते आम्हाला कसे थांबवतील ?