मुंबई
कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाडांनी दिवसाढवळ्या शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचा आरोप केला जात आहे.
यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असून भाजपला सत्तेची आणि पैशांची मस्ती आली आहे. अन्यथा एका आमदाराने पोलीस ठाण्यात कोणावरही गोळ्या झाडण्याची हिंमत केलीच कशी, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
बंदूक ही जवान, पोलिसांकडे सुरक्षिततेसाठी असते. आपण त्या वर्दीचा मान सन्मान करतो. एक आदर्श म्हणून पोलिसांकडे पाहिलं जातं. हक्क मिळवण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात जात असतो. अशा ठिकाणी पोलिसांसमोर दिवसाढवळ्या मारामारी होते. आमदाराची हिंमत कशी होते.. याला सत्तेची मस्ती नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.
देश नियम कायद्याने चालतो. सत्तेच्या मस्तीने चालत नाही. एखादा आमदार पोलिसांसमोर गोळीबार करतो, हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नाही. हे गँगवॉर आहे. जे सिनेमात पाहतो ते वास्तवात दिसतंय. हे राज्याच्या गृहमंत्र्याचं अपयश आहे, असं मी मानते. महाराष्ट्रातच इतकं गुंडारात सुरू असेल तर आम्ही पाहायचं कोणाकडे? आज भाजपकडे कुठलीही नैतिकता राहिलेली नाही. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हायला हवी. हा मुद्दा मी सोमवारी संसदेत उपस्थित करणार आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.