मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणाऱ्या ‘दक्ष’ (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासन गतीने कार्यवाही करेल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. यामध्ये कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, जागतिक बँकेचे भारत पथक प्रमुख प्रद्युम्न भट्टाचार्य, वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ डेनिस निकोलेव्ह उपस्थित होते.
दक्ष प्रकल्पाचे महत्त्व
‘दक्ष’ प्रकल्पातून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यामध्ये एकसूत्रता येणार आहे. याचा उद्देश जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि महिला तसेच समाजातील प्रत्येक घटकाला आवश्यक कौशल्ये प्रदान करणे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकास आणि नाविन्यतेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या असून, जागतिक कौशल्य केंद्र व नाविन्यता नगर निर्माणावरही चर्चा झाली.
प्रकल्पासाठी पुढील पावले
• प्रकल्प अंमलबजावणी कक्षासाठी ४५ मनुष्यबळाला मंजुरी.
• कौशल्य विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे.
• सर्व विभागांमध्ये समन्वय साधून उद्योगांच्या मागणीनुसार काळानुरूप कौशल्य विकासावर भर.
जागतिक बँकेचे भारत पथक प्रमुख प्रद्युम्न भट्टाचार्य यांनी ‘दक्ष’ प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट ठरणार असल्याचे नमूद केले.
मंत्री लोढा यांनी सांगितले की, शासन उद्योगांच्या मागणीनुसार कौशल्य विकासावर भर देत असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी सर्व स्तरावर समन्वय साधला जाईल. ‘दक्ष’ प्रकल्पातून समाजातील शेवटच्या घटकाला शिक्षण व कौशल्याची संधी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.