सांगली : उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी १७ नावांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी उद्भव ठाकरे यांनी सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतील तिढा वळण्याची शक्यता आहे. या जागेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील आग्रही आहेत. सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीमुळं आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील सांगलीची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तर दुसरीकडे काँग्रेसचे विशाल पाटील सांगली लोकसभा मतदारसंघात तयारी करीत आहे. मात्र चंद्रहार पाटलांच्या नावाच्या घोषणेनंतर मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवावी अशी समर्थकांची भूमिका आहे. अस झालं तर ही लढत अवघड ठरणार आहे.
भाजपकडून या जागेसाठी संजयकाका पाटील याना दिलं आहे. विद्यमान खासदार तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष निवडणूक लढवली तर विशाल पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा पर्यायाने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र २०१४ मध्ये भाजपने हा गड नेस्तनाबूत करीत येथून विजयी पताका फडकवला.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. संजयकाका पाटील यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील लढले होते.तर, वंचितकडून गोपीचंद पडळकर लढले होते. विरोधी मतांमध्ये विभाजन झाल्यानं संजयकाका पाटील विजयी झाले होते.