मुंबई – महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर झालीय. यात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले अमोल कीर्तिकर लागलीच अडचणीत आल्याचं दिसतंय. मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात त्यांना ईडीचं समन्स जारी करण्यात आल्याची माहिती आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे याच मतदारसंघातून खासदार आहेत, मात्र ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर विरुद्ध गजानन कीर्तिकर यांच्यात लढत होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र मुलासमोर निवडणूक लढवण्यास गजानन कीर्तिकर यांनी नकार दिलाय. कीर्तिकर यांच्यासमोर आता महायुतीत कोण उमेदवार देणार, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
खिचडी घोटाळा प्रकरण काय ?
कोरोनाच्या काळात स्थलांतरित मजुरांना वाटप करण्यात आलेल्या खिचडीच्या कंत्राटात फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात आवश्यकतांची पूर्तता नसतानाही काही कंत्राटं आणि उपकंत्राटं देण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या प्रकरणात सुजित पाटकर, राजू साळुंखे, बाळा कदम असे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अमोल कीर्तिकरांच्या अडचणीत वाढ
मुंबई उत्तर पश्चिममधून रिंगणात उतरलेल्या अमोल कीर्तिकर यांच्यासमोरच्या अडचणी यामुळं वाढणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा आणि महायुतीकडून होतोय असा आरोप मविआ नेते सातत्यानं करतायेत. त्यातच आता कीर्तिकरांना ईडीचं समन्स आल्यानं हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.