मुंबई : शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर भूमिका मांडून सरकारला अडचणीत आणणारे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांना भाजपनं (bjp )पिलिभीत मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आहे . त्यानंतर आता त्यांना काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी(Adhir Ranjan Chowdhury) यांनी त्यांना काँग्रेस प्रवेशाचा सांगावा धाडला आहे.त्यामुळं वरुण गांधी आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच ते अमेठीतून( Amethi)लोकसभा निवडणूक लढण्याबाबत तर्कवितर्क केला जात आहेत.
भाजपने तिकीट नाकारले तर वरुण गांधी अपक्ष लढू शकतात असे म्हटले असले तरी त्यांच्या गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही वा त्यांचा पुढील राजकीय निर्णय काय असेल हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण, काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधी यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांच्या अमेठीतून लढण्याची चर्चा सुरू झाली आहे.वरुण गांधी स्वच्छ प्रतिमेचे एक तगडे नेते आहेत आणि त्यांचे गांधी कुटुंबाशी नाते आहे. त्यामुळे भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारले. मला वाटते की त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, ते आले तर आम्हाला आनंदच होईल, असे अधीर चौधरी म्हणाले. अधीररंजन यांच्या विधानावर गांधी कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. तसेच भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांना सुल्तानपूरमधून उमेदवारी दिल्यामुळे वरुण गांधी यांची राजकीय कोंडी झाली आहे . पीलभीतमधून काँग्रेसचे माजी नेते जितीन प्रसाद यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी वरुण गांधी यांनी या मतदासंघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केल्याचे सांगितले जाते. मात्र, वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याविरोधात उघड टीका केल्यामुळे उमेदवारी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे .
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत असून अमेठी व रायबरेली हे दोन्ही पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसला मिळाले आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी अमेठीमधून राहुल गांधी (Rahul Gandhi) व रायबरेलीतून प्रियंका गांधी-वढेरा (Priyanka Gandhi Vadra)यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशमधील पक्षाकडून लढवल्या जात असलेल्या १७ जागांवर चर्चा झाली असली तरी, या दोन मतदारसंघांतील उमेदवारांबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अमेठीतील संभाव्य उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. २०१९ मध्ये अमेठीमधून भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता.आता वरून गांधींनी यातून निवडणूक लढवतील का या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे .