महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरे हे केवळ प्रतीक; मराठी प्रश्न अनुत्तरितच” – कपिल पाटील यांचा सवालांचा भडिमार

राज ठाकरेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया; ‘मराठीपण’ ही केवळ भावनिक नारा न राहावा – कपिल पाटील

मुंबई : “ठाकरे नावाचं गारुड महाराष्ट्राच्या समाजमनावर आहे हे खरेच, पण दोन भावांतला वाद मिटला म्हणून मराठी माणसाचे प्रश्न सुटणार आहेत का?” असा थेट सवाल शिक्षणतज्ज्ञ आणि माजी आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर पाटील यांनी मराठी समाजाच्या प्रश्नांवर खोलवर भाष्य करत सडेतोड भूमिका मांडली आहे.

कपिल पाटील म्हणाले, “मुंबईतून हाकलला गेलेला मराठी माणूस – बदलापूर, नालासोपारा, पनवेलला विस्थापित झालेला – पुन्हा मुंबईत येणार आहे का? गिरणी कामगारांच्या वारसांना घर मिळणार आहे का? बीएमसीची हॉस्पिटलं गेल्या २५ वर्षांत का बरी झाली नाहीत?”

यासोबतच त्यांनी बीएमसीमधील कंत्राटं, मराठी तरुणांना मिळणाऱ्या संधी, आणि मराठी माणसाचे खऱ्या अर्थाने होणारे राजकीय प्रतिनिधित्व यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे आणि पवारच का?” असा प्रश्न उपस्थित करत कपिल पाटील पुढे म्हणाले, “निवडणुकीत जनमान्यता मिळालेले बहुजनांचे प्रतिनिधी – एकनाथ शिंदे, नारायण राणे, छगन भुजबळ हे मूळ शिवसैनिकच आहेत. मग त्यांना मराठी राजकारणात स्थान का नाही?”

ते पुढे म्हणाले की, मराठी भाषिकांचा परिघ फक्त एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहता कामा नये. “मराठी बोलणारा मुसलमान, वसईचा ख्रिश्चन, मराठा समाजातील गरजू, आंबेडकरी बौद्ध – हे सारे मराठीच आहेत, पण त्यांच्या प्रश्नांचं काय?”

तामिळनाडूचा दाखला देत पाटील म्हणाले, “तेथे हिंदूच राहतात, पण त्यांनी हिंदुत्ववादी राजकारणाला थारा दिला नाही. म्हणून तिथलं सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितावाद टिकून आहे. महाराष्ट्रात मात्र हिंदुत्वाच्या राजकारणाने मराठी अस्मिता दुर्बळ केली आहे.”

“मराठी तरुणांची डोकी फोडणाऱ्या भावना पेटवण्यापेक्षा त्यांना रोजगार, हक्क आणि स्वाभिमान देणाऱ्या राजकारणाची गरज आहे,” असा सज्जड इशारा देत पाटील म्हणाले की, “एकत्र येणं स्वागतार्ह आहे, पण केवळ घोषणांपुरते नको – प्रश्नांची उत्तरंही मिळाली पाहिजेत.”

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात