मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल 2019 पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्रात ही नोंदणीकृत वाहनांना नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे. मात्र आता महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या दरावरून वातावरण चांगलंच तापलं आहे.
महाराष्ट्रातील नंबर प्लेटचे दर इतर राज्यांच्या पेक्षा जास्त असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यावर आता परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण नियमानुसार नंबर प्लेटच्या संदर्भातील टेंडर प्रक्रिया केलेली आहे. त्यानुसार इतर राज्यांचे दर व आवश्यक त्या सर्व बाबी हाय पॉवर कमिटीला दाखवून त्यांची परवानगी घेतली आहे, असे त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सद्य स्थितीत हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या दरावरून इतर राज्यांमधील प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेसमुळे लोकांच्या मनात थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र कोणालाही प्लेटचे दराने फिटमेंट चार्जेस वेगवेगळ्या प्रकारे आकारता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट सांगितलं. महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा दुप्पट तिप्पट वाढवले असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, 1 एप्रिल 2019 पासूनच्या गाड्यांना ही नंबर प्लेट लावणे आवश्यक नाही. त्यापूर्वीच्या गाड्यांना ही नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये यासाठी पर्याप्त सेंटर उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे या दरावरून आता परिवहन आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे.