मुंबई – महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था ही नवी बाब राहिलेली नाही. कोविड महामारीच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची पुरती वाट लागली होती, आणि आजही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पुण्यात सध्या गिअन बरे सिंड्रोम (GBS) या आजाराने थैमान घातले असतानाही, आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, लक्षणे काय असतात, उपचाराची सोय कुठे आहे, याबाबत जनजागृती करणे अपेक्षित असताना सरकार उदासीनतेने वागत असल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे.
मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष निलेश भोसले यांनी यासंदर्भात आरोप केले आहेत की, राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या दुर्दशेचे एक भीषण उदाहरण मुंबईतील शताब्दी रुग्णालयात दिसले आहे. डिसेंबरमध्ये येथे घडलेल्या एका संतापजनक प्रकाराने संपूर्ण यंत्रणेचे बिंग फुटले आहे. रुग्णालयात प्रस्थापित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण देत प्रशासन हात झटकत आहे. एका महिलेचा ECG सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते केली जात होती! या प्रकाराला रुग्णाच्या सोबत असलेल्या एका महिलेने वेळीच आक्षेप घेतला आणि संभाव्य गंभीर परिणाम टळले. पण प्रश्न हा आहे की, रुग्णालय प्रशासन, डीन, आणि जबाबदार डॉक्टर त्यावेळी कुठे होते?, महानगरपालिकेकडून भरती का काढली जात नाही?, या प्रकारावर आजतागायत कोणतीही कारवाई का झाली नाही?
यापूर्वीही शताब्दी रुग्णालयात अशा अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत, मात्र सरकार आणि प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. जणू काही सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाची किंमत उरलीच नाही, असे सरकारच्या वागण्यावरून जाणवत आहे, असा आरोप भोसले यांनी केला आहे.
आरोग्य व्यवस्थेला व्हेंटिलेटरची गरज!
महाराष्ट्र हे एक आर्थिकदृष्ट्या विकसित राज्य असूनही आरोग्य व्यवस्थेला नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. ग्रामीण भागात तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकत असतानाही उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होतो.
या पार्श्वभूमीवर, मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष निलेश भोसले यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. “सरकारच्या दुर्लक्षामुळे आज आरोग्य व्यवस्थेचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच व्हेंटिलेटरची गरज भासते आहे!” असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारने तातडीने या समस्यांकडे लक्ष द्यावे, शताब्दी रुग्णालयातील प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या सुधारासाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनतेचा रोष पत्करावा लागेल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे.