By योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई: सुमारे ७५ वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आरती भदाणे यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथेच पूर्ण केले. पुढे त्या मुंबईच्या बोरीवली (पश्चिम) परिसरात स्थायिक झाल्या. त्यांचा विवाह अशोक उर्फ विश्वनाथ सामंत यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली.
परंतु नियतीचे खेळ कोणालाच चुकलेले नाहीत. एका किरकोळ तापाच्या निमित्ताने त्यांच्या डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागली. वरळीच्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली; परंतु १९७५ च्या सुमारास त्यांच्या दोन्ही डोळ्यांनी काम करणे पूर्णपणे थांबवले.
आरती सामंत आता शरयू सामंत या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. बोरीवली पश्चिम येथील वझिरा परिसरात असलेल्या स्वयंभू श्री गणेश मंदिराच्या सान्निध्यात त्यांनी आपल्या अध्यात्मिक सेवेला प्रारंभ केला.
म्हणतात ना, “देव एखादी गोष्ट घेतो पण त्याची दुप्पट भरपाई देतो.”
गेल्या तीस वर्षांपासून शरयू ताई श्री गणेश भक्तांसाठी फुले, दुर्वा, हार, गजरे, चाफा, कमळ, पेढे, लाडू, उकडीचे मोदक अशा पूजेच्या सामग्रीचे वितरण अत्यंत वाजवी दरात करीत आहेत. विशेष म्हणजे त्या सर्व नोटा – पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास, वीस, दहा – अगदी अचूक मोजतात.
शेजारी असलेल्या श्री स्वामी समर्थ मठात येणाऱ्या भक्तांनाही त्या पूजेची सामग्री उपलब्ध करून देतात. मृदूभाषी, मितभाषी आणि मायाळू स्वभावामुळे त्या सर्व गणेश भक्तांमध्ये आदराचे स्थान मिळवून आहेत.
शरयूताईंना चोख स्मरणशक्ती लाभली आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचे (सिद्धेश आणि हर्षला) विवाह होऊन ते आपल्या संसारात स्थिर आहेत व आईची मनोभावे सेवा करत आहेत.
२०१७ साली त्यांच्या पतींचे अचानक निधन झाले. तरीही, त्यांनी आपल्या मुलांवर ओझं न टाकता आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे.
माझ्या शालेय जीवनातील एक आठवण येथे सामायिक कराविशी वाटते.
१९७५ साली माझा मित्र श्रीराम पाटणकर शाळेच्या अंतिम परीक्षेत पहिला आला होता. विशेष म्हणजे तो जन्मजात अंध होता. त्याने मला सांगितले होते की, “मी चित्रपट पाहतो.” मी आश्चर्यचकित झालो, तेव्हा त्यानेच सांगितले की, “जेव्हा मी चित्रपटगृहात बसतो आणि संवाद ऐकतो, तेव्हा मन:चक्षूंनी मी तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर पाहतो.”
यातूनच हे अधोरेखित होते की, डोळ्यांनी न पाहता देखील माणूस किती दूरदृष्टीने काम करू शकतो. शरयू ताई सामंत यांचे कार्य याचेच मूर्त उदाहरण आहे. त्या डोळ्यांनी पाहू शकत नसल्या तरी, त्या दृष्टिवानांपेक्षा अधिक चोखंदळ आणि समर्पित भावनेने सेवा करत आहेत.
त्यांच्या या निरपेक्ष, निस्वार्थ सेवेबद्दल त्यांना साश्रू नमस्कार!
वझिरा येथील स्वयंभू श्री गणेश महाराजांनी त्यांची सेवा स्वीकारावी आणि त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, हीच विनम्र प्रार्थना.