X : @NalavadeAnant
मुंबई: लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे, त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली असून आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी बुधवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्य निवडणूक आयोगाला लेखी पत्र पाठवून केली.
निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. ४३७/६/INST/२०१५-CCS दि २९.१२.२०१५ नुसार, निवडणूक प्रचारासाठी सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांच्या मालमत्तांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, अशा आशयाचे पत्र सर्व राज्यांचे कॅबिनेट सचिव, मुख्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्देशून पाठवलेले असून बंदी असतानाही एसटीच्या अधिकाऱ्यांनी १ हजाराहून अधिक बसेस (ST buses) शिवसेना उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी (election campaign) अवैधपणे वापरास परवानगी दिली आहे. एसटी महामंडळाच्या या बसेसवर शिवसेना बॅनर लावून निवडणूक प्रचार करत आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह स्पष्टपणे दाखवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे हे कृत्य केवळ आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन करत नाही तर निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षता आणि अखंडतेला बाधा आणणारे असून आदर्श आचारसंहितेचा भंग (breach of election code of conduct) केल्याप्रकरणी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, असेही लोंढे यांनी या पत्रात नमूद केले आहे.