मुंबई – राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प ‘चॅम्पियन बजेट’ असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गार काढले. लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधांचा समतोल राखत, सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाची घोडदौड सुरू असून, हा प्रवास थांबणार नाही, असा निर्धार या अर्थसंकल्पातून व्यक्त झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्ते, पूल, बंदरे आणि औद्योगिक विकासासाठी मोठ्या तरतुदी केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी आघाडीवर राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राची दीड ट्रिलियन डॉलर्स योगदान क्षमता असून, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूसारखे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फायदा होईल, असेही शिंदे यांनी नमूद केले.
‘लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचे सांगत, या योजनेसाठी अर्थसंकल्पात ३६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “गरिब आणि दुर्बल महिलांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीही तरतुदी केल्या आहेत,” याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
“विकास हाच आमचा अजेंडा असून, महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.