X : @therajkaran
मुंबई – महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या (Mahayuti government) काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं. केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली. राज्यातील आरक्षण (reservation issues) प्रश्न जाणीवपूर्वक सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख झाली, अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली. सरकारने जातनिहाय जनगणना (caste wise census) का केली नाही असा सवाल करत आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
वडेट्टीवार म्हणाले, मराठा आरक्षण (Maratha reservation) मुद्यावर सरकारची भूमीका स्पष्ट नाही. राज्यात तणाव आहे. सरकार आम्हाला, जनतेलाही विश्वासात घेत नाही. अधिवेशन सुरू असतानाही सरकारने सभागृहात कोणतीही भूमीका मांडली नाही. बहुमत असल्याने मराठा समाजाचे प्रश्न सरकारनेच सोडविले पाहिजेत. मराठा –ओबीसी समाजात (Conflict between Maratha – OBC community) सरकारने तेढ निर्माण करू नये. दोन्ही समाजाचे समाधान करावे.
वडेट्टीवार म्हणाले, येथील उद्योगधंदे भाजपशासित राज्यातच का जातात. बेरोजगारीला (unemployment) सरकार जबाबदार आहे. बेरोजगारीमुळे युवकांच्या आत्महत्या होत आहेत. 4 हजार तलाठी पदासाठी 18 लाख अर्ज येतात, यावरून वास्तव स्पष्ट होते. दाओसचा करार हा एक जुमलाच आहे. सरकारने दाओसबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली.
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj memorial), इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar Memorial) यांच्या स्मारकाचे काम महायुती सरकार करू शकले नाही. पुरोगामी राज्यात मनुस्मृतीचा चंचू प्रवेश होत आहे. समूह शाळांच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. मुलींना पारंपरिक शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. लोकसभा निवडणुकीत )Lok Sabha elections) पराभव पत्करावा लागल्याने सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली. आनंदाचा शिधा योजना फक्त कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी आहे. राज्याला ड्रगचा विळखा पडला, असे हल्लेही त्यांनी केले. धुळे, बीड, मुंबई, नागपूर येथील लोकसभा निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाला. यामध्ये काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या (Prabhu Ram) भूमीत भाजपाचा पराभव झाला. प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने तुम्ही मतं मागता म्हणून पवनपुत्र हनुमानाने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीवर गदा मारली असा टोलाही वडेट्टीवार यांनी हाणला.