मुंबई
अभिषेक घोसाळकर यांच्या निघृण हत्येनंतर उद्धव ठाकरे माध्यमांसमोर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. ‘मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वत: दिल्लीत जाऊन दिल्लीश्वरांसमोर शेपटी हलवता’, अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येविषयी बोलताना उद्धव ठाकरेंनी मोठा संशय व्यक्त केला. दहिसरमध्ये फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मात्र गोळ्या कोणी झाडल्या हे लाइव्हमध्ये दिसत नाहीये. मॉरिसने त्याला मारलं तरी त्याने आत्महत्या का केली? मॉरिसजवळ परवानाधारक पिस्तुल नव्हतं. त्याने अंगरक्षकाचं पिस्तुल वापरलं. मुळात मॉरिसने अंगरक्षक का ठेवला होता? त्याच्यावर अशी वेळ का आली होती? अभिषेकवर मॉरिसने गोळ्या झाडल्या की, इतर कोणी, त्याला मारण्याची सुपारी कोणी दिली होती? मॉरिस व ‘त्यांचा’ काही संबंध आहे का? यावेळी ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्याचा दावा केला जात आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील पोलिसांवर दबाव आहे, गेले दीड वर्षे राज्यात गुंडांगिरी सुरू आहे. खुलेआम हत्या होत आहे. सुपारी देऊन मॉरिस आणि घोसाळकरांची हत्या करण्यात आली का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांवर जनतेला विश्वास राहिलेला नाही. याआधी संजय राऊतांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. आज माध्यमांशी बोलताना हे राज्य सरकार तत्काळ बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.