X: @therajkaran
मुंबई: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत, असा आरोप शिवसेना प्रवक्त्या प्रा मनीषा कायंदे यांनी केला.
त्या म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट २८, २०२३ रोजी गांधीनगर येथे झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २६ व्या बैठकीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला मुद्दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. सरकार पाठपुरावा करत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही, आम्हाला आशा आहे की केंद्र सरकार या विषयावर त्वरित निर्णय घेईल, असे आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, तामिळ भाषेने २००४ मध्ये अभिजात दर्जा मिळवला. काँग्रेस पक्षाला तमिळ भाषा दिसते, पण महाराष्ट्रात आणि देशात त्यांचे सरकार असताना त्यांनी प्रस्ताव सुद्धा पाठवला नाही. पुढे क्रमाक्रमाने दक्षिण भारतातील जवळपास सर्वच भाषांनी अभिजातचा दर्जा मिळवला. यात कन्नड आणि तेलुगु २००८ साली, मल्याळम २०१३ आणि ओडिया २०१४ साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने इच्छा शक्ती दाखवली नाही, फक्त कमिटी पण कमिटमेंट नाही. जर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर काँग्रेस पक्षाचे दक्षिण भारताचे राजकारण बिघडणार म्हणून ते प्रयत्न करत नाहीत, असा आरोप कायंदे यांनी केला.
मनीषा कायंदे पुढे म्हणाल्या की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनुक्रमे ३ फेब्रुवारी २०१८ आणि १२ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी स्वतः केंद्राकडे पाठपुरावा केला होता. शिवाय तत्कालिन मराठी भाषा विकास मंत्र्यांकडून २६ नोव्हेंबर २०१४, १ डिसेंबर २०१६,२८ सप्टेंबर २०१७ आणि उच्च व तंत्रशिक्षण १९ ऑगस्ट २०१९ यांनी देखील पत्र लिहून पाठपुरावा केला होता. उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत. ते फक्त मुद्दे मांडतात. त्यांचे सरकार असताना त्यांनी पाठपुरावा केला नाही. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांना का विचारत नाही की तुम्ही दक्षिण भारताच्या सर्व भाषांना अभिजात दर्जा सहज दिला, मराठीला का नाही दिला ? असा सवाल आमदार मनीषा कायंदे यांनी केला.
Also Read: आर्थिक नियोजन बिघडल्याने पुरवणी मागण्या फसणार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे