X : @NalavadeAnant
मुंबई: राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झालेले असून कोणता पक्ष कोणती जागा लढविणार याचाही मसुदा तयार झाला आहे. त्यावर आता उद्या होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम केले जाईल आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत जागावाटप घोषित केले जाईल, असेही ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी मंगळवारी बैठक आटोपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक विशेष बैठक हॉटेल ट्रायडंट मध्ये पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचेही प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खा. राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ जागांवर एकमत झाल्याची माहिती दिली. आघाडीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम करून लवकरच त्याची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर राज्यातील निवडणूक सर्वेक्षणही आघाडीसाठीच अनुकूल असून लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचा पराभव होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.
Also Read: मराठी भाषा अभिजात दर्जाबाबत उद्धव ठाकरे खोटे बोलत आहेत – आमदार मनीषा कायंदे