मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सर्वच राजकीय पक्षांकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभांचा धडाका लावला जात आहे. तसेच मतदारसंघातून आपल्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे धुळे(Dhule )-जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर येणार आहेत. आज दुपारी 3 वाजता ते मुंबईकडून जळगावकडे रवाना होणार आहेत. दुपारी 3.45 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी 3.45 वाजता जळगाव येथून हेलिकॉप्टरने उद्धव ठाकरे धुळ्याकडे रवाना होतील. 4.15 वाजता धुळे येथे त्यांचे आगमन होणार आहे. या सभेत ते कोणावर रोख ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
या धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash bhamare) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यांच्या प्रचारार्थ आज ४.३० वाजता धुळे येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे . त्यानंतर 5.15 वाजता ते जळगावकडे रवाना होतील. सायंकाळी 6.00 वाजता जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार (Karan Pawar) यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या दोन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान याआधी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान (Abdul Rehman) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे धुळ्यात डॉ. सुभाष भामरे विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत होणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ (Smita Wagh) आणि शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार (Karan Pawar) यांच्यात लढत होणार आहे.