X : @therajkaran
नागपूर
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात मंत्री आणि कॉंग्रेस महिला सदस्य यांची जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
महिलांना सन्मान देण्याची संस्कृती यांची नाही, असा आक्षेप महिला सदस्यांनी घेतला तर, आपण मंत्री असताना काय केले, वाटल्यास माझ्यावर हक्कभंग आणा, असे आव्हान मंत्री यांनी दिले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्याच वेळी संतप्त विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी हरकतीवर मंत्र्यांनी चिडायची गरज काय, हे सार्वभौम सभागृह आहे. महिलांशी बोलण्याची ही रित नाही. पक्ष फोडून सत्तेत आलात, अन्यथा तुमची ताकदच नव्हती, असा टोला हाणला.
अंगणवाडी सेविकांना (Anganwadi sevika) न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narwekar) यांनी असंसदीय शब्द उच्चारले असतील तर काढून टाकले जातील असे जाहीर केले. तेव्हा गदारोळ निवळला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील मूळ प्रश्न संजय सावकारे (MLA Sanjay Sawkare) यांचा होता. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उत्तर देत होते. मात्र कॉंग्रेस सदस्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी अंगणवाडी सेविकांना पंचवीस टक्के वाढ दिली, हे चुकीचे असे निदर्शनास आणताना भरघोस मदत करा, ही मागणी केली.
आपण त्या खात्याच्या मंत्री असताना एक रुपया वाढवून दिला नाही. आम्ही वाढवले. हा माझ्या खात्याचा विषय नाही.अभ्यास करा मग बोला, असा टोला मंत्री महाजन (Minister Girish Mahajan) यांनी लगावला त्यावर यशोमती ठाकूर प्रचंड संतप्त झाल्या. मंत्री व माजी मंत्री यांच्या या चकमकीत, आपापल्या सदस्यांना समर्थन देण्यासाठी उभे राहिले. सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्ष सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. सभागृहात असंसदीय शब्द उच्चारले असतील तर ते काढून टाकले जातील असे जाहीर केले.