महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईतील झोपडपट्टीतून ६६ लाख रुग्णांच्या सेवेसाठी उभा राहिलेला प्रवास; विकास देशमुख यांना ‘सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार २०२६’

सिद्धगिरी मठाचे प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते आरोग्यसेवक विकास देशमुख यांना वाळवा येथे सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान करताना.

दोन हजारांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत भव्य गौरव; शेतकरी कुटुंबांकडून मानवसेवेचा सन्मान

वाळवा (जि. सांगली) : समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने एकत्र येणे ही आजच्या काळात दुर्मीळ घटना मानली जाते. मात्र गेली १६ वर्षे गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अविरत कार्य करणारे आरोग्यसेवक विकास ज्ञानू देशमुख यांच्या सन्मानासाठी वाळवा तालुक्यातील शेतकरी कुटुंबांनी आयोजित केलेला ‘सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार २०२६’ सोहळा हा समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि मानवतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

वाळवा येथील देवकर हॉलमध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमात सिद्धगिरी मठ, कणेरीचे मठाधीपती प.पू. श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते विकास देशमुख यांना ‘सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग सहकार्यवाह संजय भागवत तसेच वाळवा तालुका संघचालक आर. ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन, दीपप्रज्वलन आणि भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. यानंतर विकास देशमुख यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. या माहितीपटाला उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

या प्रसंगी राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. के. वेंकटेशम आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त तथा माजी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय देशमुख यांचे विशेष व्हिडिओ संदेशही प्रदर्शित करण्यात आले.

७ बाय ८ च्या झोपडीतील संघर्ष ते लाखो रुग्णांची सेवा

देवराष्ट्रे-शिरगाव (ता. वाळवा) या ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले असलेले विकास देशमुख यांनी मुंबईतील एका झोपडपट्टीतील अवघ्या ७ बाय ८ फूटांच्या खोलीतून संघर्षमय प्रवासाला सुरुवात केली. विद्यार्थी चळवळीतून सामाजिक कार्यात आलेल्या देशमुख यांनी पुढे आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली.

त्यांच्या नेतृत्वाखालील सी.एस. क्रिएटिव्ह सोल्युशन्स ही संस्था आज देशातील १२ राज्यांमध्ये कार्यरत असून आतापर्यंत ६६ लाखांहून अधिक रुग्णांना विविध शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत मोफत व कॅशलेस उपचार मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये एका वर्षात तब्बल १०० कोटी रुपयांचे आरोग्य दावे (क्लेम) निकाली काढण्याचा विक्रमही त्यांच्या नेतृत्वाखाली नोंदवला गेला आहे.

पुरस्काराची रक्कम सेवाकार्यासाठी समर्पित

पुरस्कार स्वीकारल्यानंतर विकास देशमुख यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून लाखो रुग्णांच्या विश्वासाचा आणि मातृभूमीच्या संस्कारांचा गौरव असल्याचे सांगितले.

“ग्रामीण भागातील युवकांनी समाजाभिमुख उद्योग आणि व्यवसाय उभारावेत. जहाजे किनाऱ्यावर सुरक्षित राहण्यासाठी नसतात; ती समुद्रातील वादळांचा सामना करण्यासाठी असतात,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले.

यावेळी त्यांची पत्नी आणि उद्योजिका सौ. तनुजा देशमुख यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. शेतकरी बांधवांनी दिलेला ₹५१ हजारांचा संपूर्ण सन्माननिधी सिद्धगिरी मठाच्या सेवाकार्यासाठी समर्पित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

तसेच ईश्वरपूर येथे कंपनीची नवीन शाखा सुरू करून वाळवा परिसरातील ३० युवक, ३० युवती, १० डॉक्टर आणि अन्य तरुणांना मिळून सुमारे ७० रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला.

अग्निवीर जवानांच्या पालकांचाही गौरव

कार्यक्रमात भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या पृथ्वीराज शिंदे, अवधूत कदम आणि सुहास हवालदार यांच्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

प्रमुख वक्ते संजय भागवत यांनी, “गरजू रुग्णांसाठी विकास देशमुख हे आज आशेचे नाव बनले आहेत,” असे गौरवोद्गार काढले. तर प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी “विकासजींचा गौरव म्हणजे सेवा, समर्पण आणि मानवतेच्या मूल्यांचा गौरव आहे,” असे सांगत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

दोन हजारांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा केवळ पुरस्कार वितरण कार्यक्रम न ठरता सेवा, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

Rajkaran Bureau

About Author

1 Comment

  1. Prasanna

    June 22, 2026

    समाज उपयोगी उल्लेखनीय कार्य… हार्दिक अभिनंदन!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात