सांगली : सांगली लोकसभेसाठी मविआतील चुरस जागावाटपानंतरही कायम आहे. हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला सोडल्यानं स्थानिक काँग्रेस नेते नाराज आहेत. यातच काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यामुळं काँग्रेसला धक्का बसला आहे. मात्र आज प्रचारसभेत चंद्रहार पाटलांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. विशाल पाटलांकडून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, याशिवाय माजी आमदार विलासराव जगताप यांचा विशाल पाटलांना पाठिंबा दिला आहे. या दबावतंत्रामुळे चंद्रहार पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र चंद्रहार पाटलांनी आज प्रचारसभेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.
तुम्हाला माझी अडचण वाटत असेल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. त्यापूर्वी काँग्रेसने जाहीरपणे सांगावं की, शेतकऱ्याचा मुलगा लोकसभेच्या निवडणुकीसाठी लायक नाही. माझ्या पाठीमागे कोणता कारखाना नाही, माझे वडील, आजोबा कोणी मुख्यमंत्री नव्हते त्यामुळे मी निवडणूक लढवू शकणार नाही, असं काँग्रेसने जाहीर करावं, तर जाहीरपणे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, अशा शब्दात चंद्रहार पाटलांनी आपला राग व्यक्त केला.
काँग्रेससाठी कार्यकर्ते आक्रमक
ग्रामपंचायत सदस्यही नसताना सांगलीची जागा चंद्रहार पाटील यांना दिल्यानं काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक होते. सांगलीतील काँग्रेसच्या कार्यालयावरचा बोर्डही हटवण्यात आला होता. कांग्रेस वरिष्ठांशी वारंवार चर्चा करुनही दाद न मिळाल्यानं अखेर विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपालाही धक्का
दुसरीकडे भाजपाच्या संजयकाका पाटील यांनाही धक्का बसलाय. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यामुळं विशाल पाटील यांची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गटबाजी आणि अवमूल्यन केल्यानं राजीनामा दिल्याचं जगताप यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं की, भारतीय जनता पार्टीमध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केलं आहे. परंतु पक्षाने त्याची दखल न घेता अलीकडे माझ्या विरोधात गट बांधण्याचं व माझं अवमूल्यन करण्याचं काम वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आलं आहे. ते मला सहन करणे शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्ष्याच्या जबाबदारीतुन मुक्त होतो.