मुंबई : “भारत क्रिएटिव्ह एंटरटेनमेंट इकॉनॉमीमध्ये जागतिक नेतृत्व करेल, असा मला ठाम विश्वास आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट – वेव्हज 2025’ या जागतिक समिटच्या पार्श्वभूमीवर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमवेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत हे भव्य समिट होणार असून, यामध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. पाच हजारांहून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हे समिट दरवर्षी मुंबईतच होणार असून, त्यामुळे मुंबईचे जागतिक करमणूक राजधानी म्हणून स्थान अधिक बळकट होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
“जगाला भारताच्या सर्जनशीलतेची, प्रतिभेची आणि सांस्कृतिक समृद्धीची ओळख करून देण्याची ही अभूतपूर्व संधी आहे. ‘वेव्हज 2025’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नव्या भारताची नवी ओळख’ या दृष्टिकोनाला दिशा देणारे भक्कम पाऊल ठरेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासन या समिटसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मालाडमध्ये जागतिक दर्जाचा एंटरटेनमेंट हब
या समिटच्या अनुषंगाने केंद्र सरकार मालाड येथील 240 एकर जागेवर जागतिक दर्जाचा एंटरटेनमेंट हब उभारणार आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) ही अत्याधुनिक संस्था मुंबईला देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला राज्याचे मुख्य सचिव, केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.