मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेचा विषय असलेल्या ठाणे आणि कल्याणमधील उमेदवारी अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. या दोन्ही मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार याकडे लक्ष लागलं असतानाच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली रणनीती ठरवण्यासाठी कल्याण लोकसभा ( Kalyan Loksabha) मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. कल्याणमध्ये सध्या श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणता नवा डाव टाकणार याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
मातोश्रीवरील बैठकीमध्ये कल्याणमध्ये उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा केली जाणार आहे. आज होणारी बैठक अंतिम असल्याने उमेदवारीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. कल्याणमध्ये महायुतीकडून उमेदवार जाहीर झाला नसल्याने या बैठकीमध्ये जर उमेदवार श्रीकांत शिंदे असतील तर त्यांच्या विरोधात ठाकरेंकडून कोण असणार? यावरती बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटांकडून केदार दिघे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार का? याचीही चर्चा आहे. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांवर भाजप आणि शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्याने या मतदारसंघातील अजूनही चर्चा सुरूच आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी पहिल्याच यादीमध्ये येण्याची चर्चा असतानाच त्यांना राखीव ठेवण्यात आलं आहे. ठाणेमधून राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबत असल्याने भाजपने हीच संधी साधत एकनाथ शिंदे यांना ठाणे सोडण्यास सांगितलं आहे. मात्र, ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ते मतदारसंघ सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे ठाण्याच्या बदल्यात कल्याणची जागा त्यांना दिली जाते का? याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये कल्याण आणि ठाणे जागेवरून वाद सुरु आहे. भाजपच्या रविंद्र चव्हाण तसेच भाजप पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. मात्र, यावरती तोडगा काढण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं होतं. मात्र, आता कल्याणच्या बदल्यात ठाणेवर भाजपकडून दावा करण्यात आल्याने या ठिकाणी कल्याण आणि ठाणे हे दोन्ही मतदारसंघ एकनाथ शिंदे आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होतात की एक मतदारसंघावर पाणी सोडावं लागणार याकडे सुद्धा लक्ष आहे.