महाराष्ट्र विश्लेषण

गद्दार कोण? रामदास कदम की गजानन किर्तीकर? शिंदे सेनेच्या नेत्यात शिमगा

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

लोकसभा निवडणुकीला अजून सहा महीने आहेत, जागा आणि मतदारसंघ वाटपाची अजून चर्चाही नाही, पण मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कोणी निवडणुक लढावी या मुद्द्यावरून शिसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि माजी मंत्री रामदास कदम (war of words between MP Gajanan Kirtikar and Ramdas Kadam) या दोन्ही ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये शाब्दिक युद्ध जुंपले आहे. होळीच्या सणालादेखील अजून चार महीने असताना गद्दार कोण हे सिद्ध करण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये शिमगा पेटला आहे.

निमित्त झाले मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक कोणी लढवावी या मुद्द्यावरून. रामदास कदम आणि गजानन किर्तीकर हे दोन्ही नेते पक्ष फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. किर्तीकर यांचे पुत्र आणि युवा सेना नेते अमोल हे अजुनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून ते ठाकरे गटाचे याच लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आहेत.

गजानन किर्तीकर हे विद्यमान खासदार असल्याने मुंबई उत्तर पश्चिम मंतदारसंघावर (Mumbai North West Lok Sabha constituency) शिंदे गटाचा नैसर्गिक दावा आहे. मात्र, आरोग्याच्या तक्रारी असल्याने गजानन किर्तीकर यांनाच शिंदे गटाकडून तिकीट मिळेल याची खात्री नसली, तरी गजानन किर्तीकर विरुद्ध अमोल किर्तीकर अशी लढत रंगेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले, तर गजानन कीर्तिकर निवडणुकीचा अर्ज भरतील आणि प्रचारच करणार नाहीत, साहजिकच ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर निवडून येतील, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

असे होण्यापेक्षा त्यांचा मुलगा सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांना गजानन किर्तीकर यांच्या ऐवजी उमेदवारी द्यावी, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे.

ही मागणी करतांना रामदास कदम यांनी गजानन किर्तीकर कसे गद्दार आहेत, याचे उल्लेख केले. त्यावर चिडून जाऊन किर्तीकर यांनीही कदम यांचा राजकीय इतिहास काढला आहे.

रामदास कदमांचा गद्दारीचा इतिहास फार मोठागजानन किर्तीकर

“आज काही वृत्‍तपत्रात माजी विरोधी पक्षनेते व माजी आमदार रामदास कदम यांनी माझ्यावर पक्ष गद्दारीचा संशय व्‍यक्‍त केला आहे. पण असे आरोप करण्यापूर्वी त्यांनी एक लक्षात घ्यावे की, त्यांचाच गद्दारीचा इतिहास फार मोठा असून त्यांनी वेळीच तोंड आवरावे अन्यथा त्यांना मोठा मनस्तापाला सामोरे जावे लागेल.

कदम यांनी माझ्यावर गद्दरीचे वायफळ आरोप केले खरे. परंतू ते नुसते वायफळ आहेत. खरं तर मी १९९० साली ज्या वेळेस स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hinduhruday Samrat Balasaheb Thackeray) यांनी मला पहिल्यांदा मालाड विधानसभेतून निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली त्‍याचवेळेला रामदास कदम हेही कोकणातून खेड मतदारसंघातून विधानसभेची  निवडणूक लढवत होते. त्याचवेळी त्यांनी माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्‍यांनी खेडला नेले होते. मला पाडण्‍यासाठी अथक प्रयत्‍न केले, पण ते यशस्‍वी झाले नाहीत, वरून मी १० हजार मताधिक्‍याने विजयी झालो. हा सर्व घटनाक्रम मी त्याचवेळी स्व. बाळासाहेबांच्या कानीही घातला होता.

इतके कमी म्हणून की काय, अगदी अलीकडे कदम यांना तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदारकीचे तिकीट नाकारले त्यावेळी संतापून याच रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची त्यांच्याच विधानसभा मतदारसंघ खेड-भरणा नाका ते भोर-पुणे या प्रवासात पवारांच्याच गाडीत बसून राष्‍ट्रवादीत प्रवेश करण्‍याबाबत सविस्‍तर चर्चा करीत होते, हे त्‍यांनी विसरू नये आणि खेडमधील शिवसैनिक देखील हे विसरलेले नाहीत.

एवढेच कशाला कांदिवली पूर्व महानगरपालिकेच्‍या वॉर्डामधून त्‍यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेना पक्षातून निवडणूक लढत असताना, त्‍यांना निवडून आणू नका म्‍हणून सर्व कार्यकर्त्‍यांना हेच माजी आमदार रामदास कदम दमबाजी करीत होते. इतकेच नाही तर माजी खासदार व सेनेचे एक नेते अनंत गीते यांना देखील २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत पाडण्‍यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनतही घेतली होती. परंतु कोकणातील निष्‍ठावान शिवसैनिक गीतेंच्‍या पाठीशी उभे राहिल्‍यामुळे प्रचंड मताधिक्‍याने ते विजयी झाले.

आजमितीस त्‍यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्‍याची इच्‍छा झाली आहे, म्‍हणून ते विविध मार्गांनी खोट्या बातम्‍या वृत्‍तपत्र व सोशल मिडीयावर प्रसारित करून पक्षातील वातावरण गढूळ करण्‍याचा निष्‍फळ प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांच्‍या या दबावतंत्राला शिवसेना मुख्‍य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थारा देणार नाहीत, अशी मला व सर्व शिवसैनिकांना खात्री आहे. त्‍यामुळेच वैफल्‍यग्रस्‍त झाल्‍यामुळे रामदास कदम आदळआपट करीत असून रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्‍वाच्‍या मनात आणि जनतेच्‍या मनात हेतुपूर्वक संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. त्‍यांनी वेळीच हे बालिश व वायफळ प्रयत्‍न थांबवावेत, अन्यथा त्यांची कुंडलीच मला उघड करावी लागेल. मी आताही आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षातूनच निवडणूक लढण्‍याचा निर्धार केलेला असून  यावेळेलाही मी साडेतीन लाख मताधिक्‍याने जिंकणारच.

दरम्यान, मी कधीही पक्षाक्षी बेईमानी केली नाही. गद्दारीचे काम कधीही केले नाही. पक्षाच्या वाईट काळात मी मोठे योगदान दिले आहे. मी मराठा असून गद्दाराची अवलाद नाही, गद्दारांची अवलाद ही गज्याभाऊची असेल, अशी जहरी टीका शिवसेनेचे नेते रामदाम कदम यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर केली आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात