मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे .या प्रचार आणि सभेसाठी आता शिवसेना ठाकरे गट (Uddhav Thackeray Shiv Sena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) या दोन्ही पक्षांनी 17 मे ला शिवाजी पार्क (Shivaji Park )मैदान मिळावे यासाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचं मुंबई महापालिकेने दिलेल्या इनवर्ड नंबर वरून दिसत आहे. त्यामुळे नियमानुसार शिवाजी पार्क मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळणार असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे.तर दुसरीकडे ठाकरे गटानेही या मैदानासाठी दावा केला आहे . त्यामुळे प्रशासन ही जागा कोणाला देणार ,या शिवाजी पार्कात कुणाचा आवाज घुमणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनसे नेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar)यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं, 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी अगदी अशाच प्रकारे एका दिवशी सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेने अर्ज केला होता. मात्र त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिले अर्ज केला असल्यामुळे त्यांना सभेसाठी मैदान देण्यात आले होते. यावेळेस आम्ही पहिला अर्ज केलाय, त्यानंतर शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आला आहे. त्या संदर्भातील कागदपत्र आम्हाला पालिकेकडून मिळाली आहेत. कागदपत्रांवर आमचा इनवर्ड नंबर आहे, त्यामुळे यूडीला जरी हे कागदपत्र पाठवले, तरी एवढी नियमानुसार निर्णय घेईल आणि आम्हाला परवानगी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे . दरम्यान 2016 च्या शासन निर्णयानुसार, विशिष्ट 39 दिवस वगळता इतर दिवशी शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी देण्याचा अधिकार हा नगर विकास विभागाला आहे. त्यामुळे नगर विकास विभाग आता या दोन अर्जांवर नेमका काय निर्णय घेतो आणि 17 मे रोजी कोणाला सभा शिवाजी पार्क मैदानावर करायला परवानगी मिळते, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .
शिवाजी पार्कसाठी अर्ज केलेल्या यातील प्रत्येक पक्षाला परवानगी मिळेलच असं नाही. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी देण्यासाठी नियम, अटी आणि दिवस या सगळ्यांचा विचार करून परवानगी दिली जाते. एकाच तारखेला जर दोन पक्षांनी अर्ज केले असतील तर ज्या पक्षाने पहिल्यांदा अर्ज केला आहे त्या पक्षाला परवानगी दिली जाते.त्यामुळे आता ठाकरे कि मनसेला परवानगी मिळणार या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे .