भाजपला सत्तेबाहेर ठेवत मनसे-काँग्रेसला सोबत घेणार!
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला केवळ २९ जागा मिळाल्यानंतरही पहिली अडीच वर्षे महापौरपद मिळावे, असा हट्ट उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी धरला होता. मात्र भाजप नेतृत्वाने त्यांच्या या मागणीला ठाम नकार दिल्याने शिंदे नाराज झाले. त्याचाच ‘राग’ काढत त्यांनी थेट कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती आखल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
शिंदे यांनी स्थानिक पातळीवर मनसेच्या नेत्यांना सोबत घेत अवघ्या दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेसलाही आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न सुरू केले असून, तिथे शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. या खेळीमुळे येत्या काळात महायुतीतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत भाजपचाच महापौर असावा, यावर केंद्रीय नेतृत्व ठाम आहे. इतकेच नव्हे तर स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती, विधी व न्याय, वृक्ष प्राधिकरण अशा सर्व महत्त्वाच्या समित्याही भाजपकडेच असाव्यात, यासाठी प्रदेश भाजप नेतृत्वाने यंदा जोरदार आग्रह धरला. यामुळे शिंदे यांचा हिरमोड झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा करत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी गुप्त चर्चा केली. मात्र त्यांच्या मागण्यांना तिथेही फारसे महत्त्व मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यानंतर थेट दिल्लीतूनच शिंदे यांनी आपले पुत्र व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला सत्तेबाहेर ठेवून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी मनसेचे स्थानिक नेते, माजी आमदार राजू पाटील यांची खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत भेट घेत पक्षाचा पाठिंबा मिळवला.
याच दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे तीन नगरसेवक आपल्या बाजूने वळवले असून, आपल्या गटाची अधिकृत नोंदणी करण्यासाठी या नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेतली. या घडामोडींची माहिती मिळताच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तसा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांना पाठवला.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर राज ठाकरे यांनी कारवाई करावी, अशी मागणी माध्यमांसमोर केली. मात्र राज ठाकरे यांनी यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मनसेचे विश्वासू नेते संदीप देशपांडे यांनी ही स्थानिक पातळीवरील बाब असून राज ठाकरे यांना याची कल्पना असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संख्याबळाचा खेळ
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६२ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे.
सध्याची स्थिती –
- शिंदे गट : ५३ नगरसेवक
- भाजप : ५० नगरसेवक
- मनसे : ५ नगरसेवक
- काँग्रेस : २ नगरसेवक
शिंदे गटाने ठाकरे गटाचे ३ नगरसेवक फोडल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटातून पुन्हा मनसेत गेलेले नगरसेवकही सत्तास्थापनेवेळी मनसेसोबत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेचे संख्याबळ ५ वरून ७ झाले आहे.
यात काँग्रेसचे २ नगरसेवकही सोबत आले, तर शिंदे गटाचे संख्याबळ –
५३ + ७ + 3 = ६३
असे होत असून, आज तरी शिंदे सत्तास्थापनेत यशस्वी झाल्याचे चित्र दिसत आहे.
महायुतीत वादळ?
या सर्व घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्याच शिवसेनेसमोर अडचणींचा डोंगर उभा केला आहे. राज्यात महायुती म्हणून एकत्र सत्तेत राहायचे, निवडणुकीनंतर मात्र सत्ता मिळवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या ‘स्वगृही’च राजकीय डाव टाकायचा – या शिंदे यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
प्रदेश भाजप नेतृत्वही या प्रकारामुळे संतप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय तडजोडीचे ‘माहीर’ आणि भाजपचे ‘चाणक्य’ मानले जाणारे रविंद्र चव्हाण यांना याचा आधी सुगावा लागला नाही, यावरही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मात्र एक मात्र निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण आगामी काळात याचे राजकीय उत्तर शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे संकेत सध्या स्पष्ट दिसत आहेत.

