X : @NalavadeAnant
नागपूर
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात केलेल्या आरोपावरून हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर चांगलेच आक्रमक झाले. कोणतीही शहानिशा न करता उपसभापतींचा अवमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Breach of Privilege motion) दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी बुधवारी सभागृहात केली.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी उपसभापती निलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी दिली नसल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून आज सभागृहात दरेकर चांगलेच आक्रमक झाले. आमदार रविंद्रे धंगेकर (Ravindra Dhangekar) हे विधानसभेचे सदस्य आहेत. विधान परिषदेचे सदस्य नसताना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नाही. सुषमा अंधारे माहिती न घेता बेजबाबदार कशा काय बोलू शकतात? सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील, माहिती न घेता सभापतींवर आरोप करणार असतील तर आम्ही ते सहन करणार नाही, अशी भुमिका घेत दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणावा, अशी मागणी केली. त्यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारेंनी येत्या आठ दिवसांत दिलगिरी पत्र दिले नाही तर त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ, असे सांगून दरेकरांना आश्वस्त केले.