मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित न्यायप्रविष्ट आणि प्रशासकीय प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ड्राइव्ह’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबई विभागातील ४१६ प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रकरणे लवकरच सोडवली जाणार आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई सहसंचालक कार्यालयाला भेट देत मोहिमेचा आढावा घेतला. प्रत्येक प्रकरणाचा त्वरित निकाल लावा, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
सध्या विभागाशी संबंधित ३२०० हून अधिक प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत, त्यामुळे मोठा वित्तीय आणि प्रशासकीय ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत वेतनवाढ, वैद्यकीय प्रतिपूर्ती, पदोन्नती, निवृत्तीवेतन, सेवाखंड आणि अनुकंपा भरतीसारखी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढली जात आहेत. न्यायालयीन प्रकरणांचे कालबद्ध नियोजन केल्याने वेळेची आणि आर्थिक बचत होत असून प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनत आहे.
“विभागातील कोणतेही प्रकरण प्रलंबित राहता कामा नये, सर्व प्रकरणे वेळेत निकाली काढावीत,” असे स्पष्ट निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.