मुंबई : राज्यातील वसतीगृहे व शाळांमधील स्वच्छता, भोजन आणि अन्य सुविधांची तपासणी करण्यासाठी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी द्याव्यात, तसेच गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्व योजना थेट बॅंक खात्यात (DBT) जमा करण्यावर भर
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनांचे १००% लाभ थेट बॅंक खात्यात जमा होण्याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
वसतीगृहे व शाळांची तपासणी अनिवार्य
शाळा आणि वसतीगृहातील पिण्याचे पाणी, स्वच्छता, भोजनाच्या गुणवत्तेची पाहणी अधिकारी, मंत्री स्वतः करावी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
तक्रार निवारणासाठी ॲप विकसित करणार
वसतीगृहे आणि शाळांमधील सुविधांवरील तक्रारी त्वरित नोंदवण्यासाठी एक विशेष ॲप विकसित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नव्या योजनांचा आढावा, तसेच अडचणी सोडवण्यावर चर्चा करण्यात आली.