महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha : हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांकडून हवी मुलीच्या राजकीय भवितव्याची हमी

X : @vivekbhavsar

मुंबईबारामती लोकसभा निवडणुक लढण्यासाठी झोकून देऊन काम करणारी अंकिता हर्षवर्धन पाटील हिला ऐनवेळी निवडणूक स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याने काहीसे नाराज असलेले माजी मंत्री आणि तिचे पिताश्री हर्षवर्धन पाटील यांना कन्येच्या राजकीय कारकिर्दीची चिंता लागून राहिलेली आहे. अजित पवारांमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता, असे असतानाही हर्षवर्धन पाटील यांनी भाजप पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीत मदतीची भूमिका घेतली असली तरी आपल्या मुलीच्या भवितव्याचे काय? या प्रश्नावरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या असलेल्या अंकिता पाटील या शुगर मिल्स असोसिएशनच्या देखील डायरेक्टर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नातसून असलेल्या अंकिता या भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. अंकिता पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वडील हर्षवर्धन पाटील यांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण यंत्रणा एक हाती सांभाळली होती. हर्षवर्धन पाटील आणि पवार घराणे यांचे पारंपारिक राजकीय वैर आहे आणि या वैरातूनच अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांचा इंदापुरात पराभव केला होता. त्याची सल आजही हर्षवर्धन पाटील यांच्या मनात कायम आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, तरी अद्यापही पक्षाने त्यांना कुठलेही महत्त्वाचं मोठं पद दिलेलं नाही. पण, त्याबद्दल पाटील यांनी कधीही खंत वा खेद व्यक्त केलेला नाही. भाजपची विचारधारा अंगीकारून हर्षवर्धन पाटील जिल्ह्यामध्ये आणि खास करून बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे काम करत आहेत. अंकिता पाटील यांना लोकसभेत पाठवण्याची त्यांची मनीषा लपवून राहिलेली नाही. 

अंकिता पाटील यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बारामती मतदारसंघ पिंजून काढला आहे. उच्च विद्याविभूषित असलेल्या अंकिता पाटील या बारामती मतदारसंघाच्या पुढच्या खासदार  असतील असे बॅनर देखील बारामती मतदारसंघात झळकले होते. दरम्यानच्या काळात शिवसेना-भाजप युतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्यामुळे सारे राजकीय गणित बदलले आहेत.

शरद पवार यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना हरवण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. त्यासाठीच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या वहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होण्याची शक्यता आहे.

या नवीन समीकरणामुळे अंकिता पाटील यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. बारामती मतदारसंघात एकीकडे शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात उघडपणे विडा उचलला असून सुनेत्रा पवार यांना पराभूत करणारच, अशी शपथ घेतली आहे. काहीही झाले तरी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. 

विजय शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे तर दुसरीकडे अजित पवारांमुळे पराभवाचा सामना करावा लागल्याने हर्षवर्धन पाटील देखील अजित पवारांवर नाराज आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अजित पवार गटातील कार्यकर्ते, नेते एकेरी शब्दात शाब्दिक हल्ला चढवत होते, खालच्या शब्दात टीका करत होते, त्यामुळे देखील हर्षवर्धन पाटील नाराज होते.

अंकिता पाटील यांनी देखील अत्यंत कठोर भूमिका घेऊन आपल्याला विधानसभेत मदत होणार असेल तरच आपण अजित पवार यांना मदत करू असे स्पष्ट केले आहे. आपल्या वडिलांचा सन्मान राखला जात नसेल तर आपण अजित पवारांना मदत करणार नाही, असा इशाराच अंकिता पाटील यांनी जाहीर सभेतून दिला होता.

हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली,  फडणवीस आणि भाजपा यांनी आपल्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती केली. गेले काही वर्ष प्रामाणिकपणे भाजपचे काम करणारे हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू आणि तुमच्या कन्येच्या राजकीय कारकिर्दीची हमी घेतो, असा शब्द फडणवीस यांनी त्यांना दिला आहे. 

अजित पवार यांना आता मदत करू, त्यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सगळे प्रयत्न करू, महायुतीचा आघाडी धर्माचे पालन ही करेल, भाजपच्या वरिष्ठांचा आदेश मानू, हे सगळे करेल, पण माझ्या मुलीच्या राजकीय भवितव्याचे काय? तिला मदत होणार असेल तरच आम्ही देखील अजित दादांच्या पाठीशी उभे राहू, असे हर्षवर्धन पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधी बोलताना स्पष्ट केले. मला वाटत असलेली काळजी देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य आहे आणि म्हणूनच त्यांनी अजित पवार यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचा शब्द दिला आहे आणि त्यातून निश्चित मार्ग निघेल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

Also Read: मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात हमरीतुमरी

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात