मुंबई : राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यातून (Satara LokSabha )मोठा धक्का बसला आहे . साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीनिवास पाटील ( Srinivas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे आता सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कुणाला द्यायची, हा पेच शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे . मात्र दुसरीकडे शरद पवार यांनी स्वतः उदयनराजेंविरोधात निवडणूक लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे .
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सातारा दौऱ्यावर असून सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेताच त्यांनी स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे राहावे अशी आग्रही मागणी होत आहे. ‘श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. मी मुद्दाम साताऱ्यात येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे. तीन पक्ष मिळून यंदा एकत्र निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झालं आहे. एकापेक्षा जास्त जण साताऱ्यातून लढण्यास उत्सुक आहेत. काही जणांनी मी निवडणूक लढवावी, असाही आग्रह धरला.’ असं शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.
या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीनिवास पाटील, सारंग पाटील (Sarang Shriniwas Patil), बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar) यांच्या नावाची चर्चा होती. श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय सारंग पाटील यांनी देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. श्रीनिवास पाटील यांचा सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी असा देखील प्रस्ताव होता. दरम्यान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उमेदवार निश्चित झाल्याचे सांगत परवा साताऱ्यात शक्तीप्रदर्शन केले होत. तसेच ही निवडणूक कमळ चिन्हावरच लढणार असल्याचेही राजेंनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत सातारची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे खासदार शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्यातून स्वतः निवडणूक लढणार का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत .