सोलापूर : महाविकास आघाडीसोबत फिस्कटल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीने स्वत: ची स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वंचितकडून लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उमेदवार देण्यात सुरुवात केली असून आतापर्यंत त्यांनी २० जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.
दरम्यान वंचितकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाचे रमेश बारस्कर यांना तिकीट देण्यात आलं आहे. बारस्कर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून वंचितमध्ये प्रवेश केल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बारस्करांची पक्षांतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
रमेश बारस्कर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचितकडून तिकीट घेतल्यानं आता पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारस्कर यांचा संपर्क अलिकडच्या काळात वाढला होता. यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आल्याचं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे.
माढ्याचं समीकरण बदलणार?
माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाचा भाजपकडून पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. हा राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखला जात होता. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांना यश मिळालं होतं. त्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा त्यांनाच संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतून अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. शरद पवार यांना महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यासाठी उत्सुक होते. मात्र जानकारांना महायुतीने परभणीतून तिकीट दिलं. त्यामुळे मविआमधून अद्याप नावं जाहीर करण्यात आलेलं नाही. दरम्यान वंचितकडून रमेश बारस्कर यांचं नाव समोर आल्यानं येथे तिरंगी लढत पाहायला मिळाले.
कोण आहेत रमेश बारस्कर?
रमेश बारसकर हे मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष आणि ओबीसी नेते म्हणून परिचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बहुतांश नेते हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र, रमेश बारसकर हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस व धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून काम पाहत होते.