भिवंडी : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. आज शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र ही जागा शरद पवार गटाला दिल्यात येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भिवंडी लोकसभा जागेवरुन महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना तिकीट देण्यात आलं असून महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही.
दरम्यान ही जागा शरद पवार गटाला देण्यात आल्याचं समजते. त्या बदल्यात शरद पवार गटाची साताऱ्याची जागा काँग्रेसला म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांना सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या मतदारसंघातून २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे निवडणूक जिंकले होते. मात्र त्यानंतर २०१४, २०१९ लोकसभेत कपिल पाटील या जागेवरुन विजयी झाले. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं पडली होती. त्यामुळे काँग्रेसकडून या जागेवर दावा केला जात होता. मात्र ही जागा शरद पवार गटाला सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान कपिल पाटलांची ही तिसरी टर्म असणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी लढत सोपी असणार आहे.
शरद पवार गटाकडून कोण आग्रही?
शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे आग्रही आहेत. त्याशिवाय जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत.