महाराष्ट्र ताज्या बातम्या

मोरेंची उमेदवारी पुण्यात कोणाला ठेवणार यशापासून वंचित

X : ajaaysaroj

मुंबई: पुणे लोकसभा मतदारसंघाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाआघाडी कडून रवींद्र धनगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली असतानाच दोन दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना तिकीट जाहीर केल्याने मोरेंची उमेदवारी पुणे लोकसभा मतदारसंघात यशापासून कोणाला वंचित ठेवते की त्यांचा दावा असल्याप्रमाणे स्वतःच यश संपादन करू शकते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावरच वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. स्थानिक पातळीवर सुरू असलेली गळचेपी, पदाधिकाऱ्यांची मनमानी आणि अमित ठाकरे यांच्या बरोबर झालेला तथाकथित वाद या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे मोरे तात्यांचा मनसेच्या सर्व पदांचा दिलेला राजीनामा होय. अर्थात राजीनामा देण्याच्या आधीपासूनच तात्यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी त्यांची ही इच्छा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापासून ते थेट माध्यमांपर्यंत अनेकवेळा जाहीर पणे बोलूनही दाखवली होती. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय राऊत, मोहन जोशी, रवींद्र धनगेकर अशा महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांच्या दरबारात हजेरी लावली. मात्र उमेदवारीचा जोगवा काही त्यांच्या पदरी पडला नाही.

अखेर उबाठा गटाबरोबर सुरू असलेला वंचित बहुजन विकास आघाडीचा राजकीय हनिमून शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सासुरवासामुळे संपला आणि राज्यात अनेकांना वंचितचा खांदा डोकं ठेवण्यासाठी मिळाला. तर उबाठाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे वंचित देखील नवीन सोयरीक जुळवायला मोकळी झाली. त्यानंतर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांची पुण्यात येऊन भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांना त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्या आणि दोन दिवसांपूर्वी अधिकृतपणे वसंत तात्यांची उमेदवारी जाहीर करून पुणे लोकसभा मतदारसंघात रंगत निर्माण केली.

वंचितचा स्वतःचा असा एक मतदारवर्ग राज्यातील अनेक मतदारसंघात आहे, तसेच सॉफीस्टेकेटेड नेता म्हणून प्रकाश आंबेडकरांचा चाहता वर्ग देखील राज्यात आहेच हे नाकारता येणार नाही. पुणे लोकसभेत वडगाव शेरी, शिवाजीनगर, कसबा पेठ, कोथरूड, पर्वती आणि पुणे छावणी असे सहा मतदारसंघ येतात. यामध्ये चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, एक मतदारसंघ राष्ट्रवादी आणि एक मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहे. ज्या कात्रज पट्ट्यात नगरसेवक म्हणून वसंततात्या मोरेंची हक्काची मते आहेत तो खडकवासला विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. तिथले हक्काचे मतदान तात्या मोरेंना मिळणार नाहीये. अर्थात मनसेच्या माध्यमातून त्यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेता म्हणून कामही केले आहे.

त्यामुळे कात्रज व्यतिरिक्त इतर भागांतून मोरे यांना स्वतःची, आणि वंचितची हक्काची किती मते मिळतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या अनिल जाधव यांना ६४,७९३ अशी ६.२६ टक्के मते मिळाली होती तर भाजपच्या गिरीश बापट यांना ६,३२,८३५ (६२ टक्के) व काँग्रेसच्या मोहन जोशी यांना ३,०८,२०७ (३० टक्के) मते मिळाली होती. बापट यांचे मताधिक्य तब्बल ३,२४,६२८ इतके घसघशीत होते. नरेंद्र मोदींच्या नावाची लाट त्यावेळी होतीच तर संघटित शिवसेना पण भाजप बरोबर युतीत होती.

पण शिवसेनेतील महाफुटीनंतर पुण्यामध्ये एकनाथ शिंदे फॅक्टर आणि त्यांची शिवसेना कितपत मतं मिळवू शकेल ही जशी शंका आहे , तशीच उबाठाची किती मते आहेत आणि ती सर्व आघाडीच्या रवींद्र धनगेकर यांच्याकडे जातील का हे प्रश्न पण आहेतच. तीच अडचण राष्ट्रवादी काँग्रेसची पण आहे. राष्ट्रवादीमधील उभ्या फुटीनंतर इथे अजित पवार गट जास्त पॉवरफुल असून, शरद पवार गट कमकुवत आहे असे बोलले जाते. महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे ज्या मुळशी भागातून येतात त्या भागातील अनेकांचे मतदान कोथरूड मतदारसंघात येते, त्याचा फायदा मोहोळ यांना होऊ शकतो. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आघाडीचे धनगेकर जरी निवडून आले असले तरी तेव्हाची गणितं आणि नाराजी वेगळी होती.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या बद्दल केवळ मतदारसंघातच नाराजी नव्हती तर भाजपमध्ये देखील सुप्त नाराजी होती. सातत्याने वर्षानुवर्षे रासने यांनाच पदांची खिरापत वाटल्यामुळे भाजपचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी देखील मनमानीला कंटाळले होते. त्यातच ब्राम्हण उमेदवार द्यावा असा सूर अनेकांनी आळवला होता. भाजप हा ब्राम्हणांचा पक्ष आहे असे केवळ बोलले जाते मात्र सर्वात जास्त अन्याय भाजपमध्ये ब्राह्मणांवरच होतो, अशी धारणा कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली होती. गिरीश बापट यांच्या दुर्दैवी निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बापट यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जावी अशी मागणी स्थानिक भाजपमध्ये उमटू लागली, अर्थात उमेदवारी आम्हाला नको असा निर्वाळा बापट कुटुंबीयांनी दिला होता ही बाब अलाहिदा. पण तेव्हा उमेदवारी पटकावली मात्र स्थायी समितीत मक्तेदारी असलेल्या हेमंत रासने यांनीच, असे तेव्हा कसब्यात बोलले जाऊ लागले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात डॉ मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिल्याचे पडसादही २०१९ मध्ये उमटले होतेच. ब्राम्हण संघाने जाहीरपणे चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला होता. केंद्रीय नेतृत्वाला याची दखल घेऊन कुलकर्णी यांची समजूत काढावी लागली होती. त्यानंतरही मतदारसंघात कुळकर्णी – पाटील हा वाद सुप्तपणे सुरूच होता. चांदणी चौक पूल बांधकाम आणि त्याचे लोकार्पण श्रेय यावेळी देखील कुळकर्णी यांनी आपली नाराजी लपवली नव्हती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यावेळी मध्यस्थी करून डॉ मेधा कुलकर्णी यांना आश्वस्त करावे लागले होते. ती नाराजीची धग शांत झाली नव्हतीच तर रासने यांनी बापटांच्या जागेवर तिकीट पटकावले. या सर्व घटकांचा परिणाम हेमंत रासने यांची सीट पडण्यात झाला होता असे भाजपच्या पराभवानंतर बोलले जाऊ लागले.

पण आत्ता लोकसभेला संपूर्ण गणित वेगळे आहे. इथे होणारे मतदान हे नरेंद्र मोदींना होणारे मतदान आहे हे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी सांगितले जात आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व पेठांमध्ये असणारा ब्राम्हण मतदार आणि संघ स्वयंसेवक उमेदवार न बघता फक्त कमळ हे चिन्ह बघून मतदान करेल असा विश्वास भाजपला आहे. कितीही नाकारले आणि जाहीर सभांमध्ये भाषणे दिली तरी जातीची गणित राजकीय पक्ष कुठलाही असो त्याला विचारात घ्यावीच लागतात. सुनील देवधर यांनी संपूर्ण पुण्यात जोरदार होर्डिंगबाजी करून उमेदवारी मिळवण्याची हवा केली होती, मात्र डॉ मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेत पाठवले तेव्हाच देवधर यांचा पत्ता कट झाला होता. मराठा आरक्षण हा मुद्दा महायुतीला सातत्याने त्रासदायक ठरत असताना, राज्यसभेत कुलकर्णी आणि लोकसभेत देवधर असे दोन्ही ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधी पुण्यातून देणे भाजपला सोशल इंजिनिअरिंग म्हणून परवडणारे नव्हते.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे भाजयुमोपासून गेली कित्येक वर्षे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते राहिले आहेत. पुणे महापालिकेत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. सर्वार्थाने जिंकून येण्याचे निकष पूर्ण करत असलेल्या व मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोहोळ यांनाच उमेदवारी देणे हे भाजपसाठी राजकीय दृष्ट्या योग्यच होते. त्यामुळे कसब्यात पोटनिवडणुकीत जिंकणे हे वेगळे होते याची जाण महाविकास आघाडीच्या धनगेकर यांना नक्कीच असणार. त्यातच आंबेडकर यांच्या वंचितने वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्याने रवींद्र धनगेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण वंचितची ही मते भाजपला कधीच मिळाली नसती पण महाविकासआघाडीचे धनगेकर मात्र ही हक्काची मते घेऊ शकले असते ती मते आता मोरे यांना जाऊ शकतील. त्यातच वसंत मोरे देखील मराठा समाजातून येतात, नुकतीच त्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. पुण्यात देखील मराठा आंदोलन जोरात होते. त्यामुळे येथील मराठा समाज किती प्रमाणात मुरलीधर मोहोळ यांच्याकडे झुकतो आणि किती प्रमाणात तात्या मोरेंना साथ देतो हे बघणे पण औत्सुक्याचे ठरणार आहे.

थोडक्यात , वसंत मोरेंची उमेदवारी धनगेकर यांना मिळणारी वंचितची मते घेऊन आणि मोहोळ यांना मिळू शकणारी मराठा समाजाची काही मते घेऊन कोणाला पुणे लोकसभेत यशापासून वंचित ठेवते हे चार जूनलाच समजणार आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात