मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha) जागेवरून सुरु असलेला वाद आज संपला आहे . या जागेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray )यांचा शिलेदारच निवडणूक लढणार असल्याचे आज निश्चित झाले आहे . या मतदारसंघात त्यांच्याकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil )यांना उमेदवारी देण्यात आली आहे . आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. या पत्रकार परिषदेत अखेर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना (Shiv Sena) 21, काँग्रेस (Congress)17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar group) 10 असे जागावाटप झाले आहे. यामध्ये सांगलीची जागा काँग्रेसला सुटली आहे . त्यामुळं आता विशाल पाटील नेमकी भूमिका काय घेणार? याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे . काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे नेते, सांगलीतून उमेदवारीसाठी इच्छूक असणारे विशाल पाटील नॉटरिचेबल आहेत. काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोरही सध्या शांतता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे या जागांवर ठाकरेंची तोफ धडाडणार आहे .
काही दिवसापूर्वी सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल असा विश्वास आमदार विश्वजीत कदमांसह विशाल पाटील यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्ही सांगलीच्या जागेसाठी आग्रही असल्याची भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील बोलून दाखवली होती. मात्र आता त्यांच्या या विश्वासावर पाणी फिरले आहे . या मतदारसंघात ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील लोकसभेची जागा लढवणार आहेत. त्यामुळं आता विशाल पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे .