मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला (Congress) धक्यावर धक्के बसत आहेत . काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणारे पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी पक्षाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश (CM Eknath Shinde Shivsena )केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला आहे . राजू वाघमारे हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळत होते. मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चांच्या कार्यक्रमांतही ते आपल्या पक्षाची बाजू अनेकदा ठामपणे मांडताना दिसत होते. ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केल्याने मुंबईत पक्षाला मोठा हादरा बसला आहे .
या प्रवेशावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला केला .ते म्हणाले ,काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे पक्षाची झालेली वाईट अवस्था आणि काँग्रेसची सध्या चाललेली फरपट या राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली दबलेला पक्ष झाला . सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केली.भिवंडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. या सर्व प्रकाराचा परिणाम माझ्यावर झाला आहे. यामुळे मी कॉमन मॅन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेत आहे. भविष्य काय आहे, हे भविष्य दाखविण्यासाठी आज चांगलं दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यांनी कमी वेळेत राज्याचा मोठा विकास केला आहे. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी असे काम केले नाही. हे विरोधकांना देखील मान्य करावे लागेल.असे त्यांनी म्हटले आहे .
आपल्या भारताच्या इतिहासात सर्वात जास्त काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव आहे. ज्या मुख्यमंत्र्यांना सामान्य माणूस कधीही भेटू शकतो. जो २०-२० तास काम करतो, असा मुख्यमंत्री आवडणारा असल्याचं मी चॅनलवर जाहीरपणे सांगितलं होतं. तेव्हा माझ्यावर टीका झाली, पण जे खरं आहे तेच मी बोलतो असंही राजू वाघमारे म्हणाले . त्यांच्या या निर्णयाने ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला खिडार पडले आहे .