पालघर
इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी पालघरमधील बोईसर इथल्या आंबटगोड मैदानात जाहीर सभा ठेवण्यात आली होती. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
ठाकरे म्हणाले, गद्दारांचे दोन मालक फिरतात, गद्दारांचे मालक कोण आहेत ते तुम्हाला माहित आहेत. गद्दारांचे मालक महाराष्ट्रात येऊन ते शिवसेनेला नकली म्हणतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्र यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली. तिला तुम्ही नकली म्हणताय, काय तुमची डिग्री आहे. माझे चिन्ह पळवले, पक्ष चोरला, वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टिका मोदी शहांवर केली.

भाजप पक्षाला भ्रष्ट, भेकड पक्ष म्हणत ठाकरे म्हणाले, जणू काही ईडी, सी.बी.आय, इन्कम टॅक्सवाले यांचे घरगडी आहेत. आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावतात. ज्याचा घोटाळा मोठा त्याचा मान मोठा, अशी टीका त्यानी भाजपवर केली. उद्धव ठाकरेला संपवून दाखवा, असे आव्हान यावेळी त्यांनी दिले.
महाराष्ट्रात विध्वंसकारी प्रकल्प आणायचे आणि चांगले प्रकल्प गुजरातला न्यायचे, महाविकास आघाडीचे सरकार आले तर चांगले प्रकल्प महाराष्ट्रात आणू, पालघर जिल्ह्यात एअरपोर्ट बनवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. इथल्या वाढवण बंदराला आमचा विरोध आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, पालघर जिल्ह्यात एवढे खासदार झाले, पण इथल्या पाणीटंचाईची समस्या मार्गी लागली नाही.
वाढवण बंदराने इथल्या मच्छीमारांचा विकास होणार नाही. वाढवण बंदरपुर्ण करण्यासाठी ते रणगाडे आणतील असा आरोप त्यांनी सरकारवर केला. शिंदे (मिंद्ये) अजूनही त्यांच्या मुलाची उमेदवारी जाहीर करून शकले नाहीत, पालघरमध्येही ते उमेदवार जाहीर करू शकले नाहीत, याकडे लक्ष वेढून ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.