सातारा : अखेर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा या जागेसाठी शिंदे गटासह अजित पवार गटही आग्रही होते. सातारा लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील हे इच्छुक होते. मात्र, मात्र काही दिवसांपूर्वी उदयनराजे दिल्लीला गेले होते. येथे त्यानी अमित शहांची भेट घेतली. परतल्यानंतर त्यांचं साताऱ्यात जंगी स्वागत झालं. यावेळी त्यांची उमेदवारी पक्की झाल्याचं सांगितलं जात होतं. आज अखेर साताऱ्याचा सस्पेन्स संपला असून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे साताऱ्यातून शिंदे विरुद्ध भोसले असा सामना रंगणार आहे.
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा निवडणूक लढवावी अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र तब्येतीच्या कारणास्तव श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आणि या जागेवरून शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.
ही जागा किती अवघड?
उदयनराजेंचा फॅन फॉलोविंग चांगला असता तरी प्रत्यक्षात विकासाच्या कामावरून उदयनराजे जनतेच्या पचनी पडत नसल्याचं दिसतं.
२०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध श्रीनिवास पाटील असा सामना होता. श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात केलेलं हे भाषण महाराष्ट्रभर गाजलं.
१९९९ पासून सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर तीन वेळा उदयनराजे निवडून आले आहेत. मात्र २०१९ च्या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत उदयनराजेनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. आता पुन्हा तेच वैभव मिळवणं राजेना शक्य होईल का, ते पुढील महिन्यात स्पष्ट होईल.